मुंबई - कोकणातील गणोशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या 4 ऑगस्ट पासून कोकणात जाण्यासाठी बससेवा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यातच तोंडावर आलेल्या गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाइनचा वाद सुरू झाला आहे. तसेच कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून अद्याप बस सोडण्याबाबत निर्णय झाला नाही. महामंडाळाशी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला तरी तिथून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही कोकणात जाण्यासाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले.
या बससेवेसाठी येत्या 1 जून पासून नोंदणी सुरू होणार आहे. त्याचा कोकणातील चाकरम्यांनानी लाभ घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.
यापूर्वी भाजपकडूनही रेल्वेसेवेसाठी प्रयत्न-
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याबाबतही माजी खासदार निलेश राणे यांनी आणि मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. राज्यात एसटी महामंडळाकडून अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. राज्यात सध्या कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी राज्यात ९६१५ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.