मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी कोळी बांधवांना पाठींबा देत त्यांचा प्रश्न आयुक्तांसमोर मांडू, असे आश्वासन दिले होते. या विषयावर आयुक्तांसोबत बोलण्यासाठी व नवनियुक्तीनंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते.
महात्मा फुले मंडईतील कोळी बांधवांसाठी घेतली भेट
आठवड्याभरापूर्वी छत्रपती महात्मा फुले मंडईतील कोळी बांधवांनी ऐरोली येथील स्थलांतराला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हा राज ठाकरेंनी कोळी बांधवांना पाठींबा देत आपण हा प्रश्न पालिका आयुक्तांसमोर मांडू, असे आश्वासन दिले होते. या विषयावर आयुक्तांसोबत बोलण्यासाठी व नवनियुक्तीनंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते.
कोळी बांधवांचे मंडईतच पुर्नवसन करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
मंडईची डागडुजी होईपर्यंत या कोळी बांधवांचे पुर्नवसन याच मुंबई परिसरात करण्यात येईल. त्यांचे मुंबईबाहेर स्थलांतर करण्यात येणार नाही. तसेच डागडुजी झाल्यावर त्याच मंडईत कोळी बांधवांचे पुर्नवसन करणार असल्याचे आश्वासन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
मुख्यमंत्री पदावरील वादावर भाष्य करण्यास नकार
आयुक्त भेटी दरम्यान राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाबद्दल विचारले असता त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.