मुंबई - शासन निर्णय मराठीत हवा या मागणी संदर्भातील पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे व अनिल शिदोरे यांनी आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहे. या पत्राची एक प्रत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिली आहे.
31जुलैपर्यंत महाराष्ट्र्रात टाळेबंदी चालू ठेवण्याबाबत 29 जूनला मुख्य सचिवांच्या सहिने शासन निर्णय काढण्यात आला. मात्र, राज्याची भाषा मराठी असताना तो इंग्रजीत असल्याचा आक्षेप मनसेने नोंदवला आहे. मराठीत निर्णय कुठे प्रकाशित झाला? कुठे गेला? याबाबत मनसेने खुलासा मागविला असून मराठीत प्रकाशित झाला नसल्यास तो प्रकाशित करावा. तसेच संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत भारताच्या संविधानात काय आहे, याविषयी कायदे, नियम काय हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही असा धमकी वजा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
कोविडमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार अविरत धडपड करत असून त्याचा ताण असल्याची आम्हाला जाणीव आहे, त्यामुळे आम्हाला ताण वाढवायचा नाही. जर यावर कारवाई न झाल्यास नाईलाजाने आंदोलन करावं लागेल आणि न्यायालयात जावं लागेल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.