मुंबई : अँटिलिया प्रकरणाच्या तपासाची धुरा सोपविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी सचिन वझेंच्या नियुक्तीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात एक ट्विट करून देशपांडे यांनी वझेंच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केेल आहे.
सचिन वझे कोण?
2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीतील मृत्यु प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. 2 डिसेंबर 2002 ला मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 27 वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनुस यास वाहनाने घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार, ख्वाजा युनूस अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्यानंतर 2003 पासून त्यांच्यावर याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.
जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस सेवेत दाखल -
सचिन वझेंवर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून त्यांना पुन्हा मुंबई पोलीस खात्यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. सध्या सचिन वझे या अधिकाऱ्याची नेमणूक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत (सीआययु) करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन वझेंना 6 जून 2020ला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी निलंबित असताना सचिन वझे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून शिवसेनेच्या काही पदांवर कामसुद्धा केले आहे.