मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. कालच राज ठाकरे यांचे मुंबई आणि पुण्यातील मेळावे रद्द करण्यात आले होते.
घरीच उपचार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून बिघडली होती. आज त्यांचा कोरोना रिपोर्ट समोर आला आहे. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याबरोबर त्यांच्या आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
मास्कचा वापर नाही
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक आणि पुणे दौरे केले होते. या ठिकाणी राज ठाकरे विनामास्क दिसून आले होते. संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. यावरून त्यांच्यावर टीकादेखील झाली होती.
दौरे रद्द
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भांडुप येथे तर उद्या पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार होते. हे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. या मेळाव्याला खुद्द राज ठाकरे संबोधित करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. मात्र राज यांची तब्येत यांची तब्येत ठिक नसल्यानं हे मेळावे पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.