मुंबई - दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन आज (बुधवारी) दिंडोशी सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करताना काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. याविषयी बोलताना आमदार नितेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले असून याची सत्यता समोर आणण्यासाठी आम्ही सीबीआयकडे जाणार, असे म्हटले आहे. विधानभवनात ते बोलत होते.
'सत्यता समोर यायला हवी'
आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. तट दिवशी तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर आमचा जबाब नोंदवण्यात आला. या दरम्यान डीसीपी यांना वारंवार पंधरा - पंधरा मिनिटांनी फोन येत होते व ते बाहेर जात होते. ते फोन कोणाचे होते याचा तपास सुद्धा केला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. एका मंत्र्यांचे नाव या आत्महत्या प्रकरणांमध्ये समाविष्ट असल्याने याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. दिशा सालीयन यांच्या आई-वडिलांना मुंबईच्या महापौर भेटल्यानंतर सर्व सूत्र हलली गेली, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.
'सीबीआयकडे तपास हवा'
आमचे पूर्वीपासून सांगणे आहे की दिशा सालीयन मृत्यूची सत्यता समोर आणण्यासाठी आम्ही हे करत आहोत. जर आमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ती शंका दूर व्हायला हवी. याबाबत आमचा आता राज्यातील पोलिसांवर विश्वास नसून हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही सांगितले आहे, की काही प्रकरणात राज्यातील तपास यंत्रणेवर आमचा विश्वास नसल्याने हे प्रकरण सुद्धा आम्ही सीबीआयकडे देणार आहोत.
मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे यादी
संपूर्ण प्रकरणावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले आहे, की मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे हे पदावर रुजू झाल्यानंतर सरकारकडून त्यांना एक यादी देण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये असलेल्या नावाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होत आहे. मग ते सोमैया पिता-पुत्र असू देत, नारायण राणे पिता-पुत्र असू देत, प्रवीण दरेकर असू देत, प्रसाद लाड असूदेत. ज्यांची नावे क्रमाने यादीमध्ये आहेत, त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी लगावला आहे. अशा पद्धतीचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यावर सुद्धा दोन दिवसापूर्वी लगावला होता.