मुंबई - उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे निसटले. भर पाऊस, काही किलोमीटरचा अंतर पायी कापून, बाईक आणि ट्रक असा प्रवास करत मुंबई गाठल्याची आपबिती कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना कथन केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - India Corona Cases : देशात २४ तासांत १२, २४४ कोरोना रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
विधानपरिषदेचे मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेत्यांनी रात्रीच्या जेवणासाठी ठाण्याला जाण्याचा बेत केला. जवळपास वीसएक आमदार बसमधून ठाण्याच्या दिशेने निघाले. तासाभरात ठाणे गाठले. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नसल्याने चलबिचल सुरू झाली. काही आमदारांनी विचारणा केली असता, एकनाथ शिंदे भेटणार असल्याची सबब देण्यात आली. अखेर गुजरातच्या हद्दीत बस थांबवली. त्यामुळे काहीतरी घडतंय, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. कैलास पाटील यांनी हा प्लान ओळखून दिव्य संकटातून थेट महाराष्ट्रात परतण्याचा प्रवास सुरू केला.
लघुशंकेचा बहाणा करत कैलास पाटील बसमधून खाली उतरले. मध्यरात्री बारा - साडेबाराची वेळ होती. बाहेर पाऊस कोसळत होता. कुट्ट अंधार पसरला होता. हीच वेळ ओळखून कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. जवळपास ४ किलोमीटर अंतर पावसात भिजत अंधारातून कापले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली. पुढे तो दुचाकीस्वार गाव आल्याने थांबल्यामुळे पुन्हा पायी प्रवास सुरू केला. काही वेळातच एका ट्रकला लिफ्ट मागून त्यांनी दहिसरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तेथून पुढे आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कैलास पाटील यांनी संपूर्ण घडलेला प्रकार कथन केल्याचे समजते.
हेही वाचा - Governor Koshyari Tested Corona Positive : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण