मुंबई - एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण या प्रमुख मागणीवर गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संप करत आहेत. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब तुच्छ पद्धतीचे राजकारण करून प्रसार माध्यमांवर खोट्या बातम्या पसरवून एसटी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही -
एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संप आणि संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, तरीही राज्य सरकार कोणतीही मदत करू इच्छित नाही. परिवहन मंत्री अनिल परब तुच्छ पद्धतीचे राजकारण करून आणि प्रसार माध्यमावर खोट्या बातम्या पसरवून एसटीच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकर म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांना मला सांगायचंय की आपण खूप चांगले राजकारणी आहात, पण एसटी कर्मचाऱ्यांबाबात असे तुच्छ पद्धतीचे राजकारण आपण करू नये. कारण आपल्या असंवदेनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहेत. तरीही आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खाची जाणीव होत नाही.
आंदोलन हिंसक झाल्यास सरकार जबाबदार -
राज्यभरातील तीन हजार कर्मचारी कामावर परतले, अशा खोट्या बातम्या आपण वृत्तपत्रात पसरवत असून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून उद्रेक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचं रूपांतर कुठे हिंसाचारामध्ये किंवा आत्महत्येमध्ये झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब यांची राहणार आहे. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, एसटी कामगारांचा अंत पाहू नका उद्या आंदोलन हिंसक वळणावर आले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असणार असल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.