मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सलग्न रुग्णालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आमदार निधीच्या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे अद्यादेश काढण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वाढत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे वगळता इतर जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक आहे. अनेक भागात ऑक्सिजन तुटवडा जाणवू लागला. करोनाचा सर्व स्तरावर मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने या आधीच आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपयांपर्यंचा खर्च शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषधे खरेदीसाठी वारण्यास परवानगी दिली आहे.
या आमदार निधीतून प्राणवायू सिलिंडर, बेड, व्हेंटिलेटर, करोना प्रतिबंधक औषधे इत्यादी दहा प्रकारच्या यंत्रसामुग्री, साहित्य व औषधांचा समावेश आहे. आता राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच ऑक्सिजन साठवणुकीसाठी टाक्या खरेदीकरण्याकरिता आमदार निधीतून खर्च करण्यास मान्यता दिली आहे.