मुंबई - पुनश्च हरिओम’च्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र सध्या केवळ ३३ टक्के जागेचा वापर करण्याची सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २३ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस बंद असल्याने त्यांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी केला जात होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत आतापर्यंत सम-विषम पद्धतीने दुकाने, मंडई सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता निवासाची व्यवस्था असलेल्या हॉटेल, लॉज आणि विश्रामगृहांचे द्वार खुले करण्यात आले. सध्या त्यांना केवळ ३३ टक्के जागेचा वापर करता येत आहे. लॉकडाऊननंतर आता मात्र लॉजमालक तसेच छोटे हॉटेल मालक हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जवळजवळ तीन महिने व्यवसाय बंद असल्याने आवक शून्य झाली होती. त्यामुळे या व्यावसायिकांवर आर्थिक तणाव वाढू लागला त्यात कामगारांचे पगार देणे हे सुद्धा कठीण झाले आहे.
कोरोनामुळे दळणवळणाची साधने मर्यादित असल्यामुळे प्रवासी संख्या सुद्धा घटली आहे आणि याचा थेट परिणाम लॉज आणि गेस्ट हाऊस व्यावसायावर होत आहे. आता अशा परिस्थितीत या छोट्या व्यावसायिकांना मदतीच्या हाताची गरज आहे. सरकारकडून जीएसटीच्या दरात कपात असो वा पॅकेजची मागणी हे व्यावसायिक सरकारकडे करत आहेत.