मुंबई - बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. किडवई येथे जन्मदात्यानेच अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारातून मुलीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी नराधम बापाला किडवई येथून अटक केली आहे.
48 वर्षांचा आरोपी आपल्या दोन मुली, एक मुलगा आणि पत्नीसह घाटकोपर येथील कामराज नगर येथे वास्तव्यास आहे. तो एका मॉलमध्ये सुपरवाझर पदावर काम करतो. पहाटे पाचच्या सुमारास घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीजवळ येऊन या व्यक्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. वडिलांनीच जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आईला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करताच तिला धमकावण्यात आले. तसेच आईला सांगितल्यास आत्महत्या करण्याची भीती दाखवली.
लॉकडाऊनच्या काळात बापाच्या अत्याचारातून सुटका मिळवण्यासाठी मुलीने संगमेश्वर तालुक्यातील कडवई हे गाव गाठले. त्यानंतर बाप देखील गावी आला आणि पुन्हा मुलीवर शारीरिक अत्याचार केले. अखेरीस यातून गर्भवती झाल्याचे लक्षात येताच मुलीने बदनामी होण्याच्या भितीने मुंबई गाठली. अखेरीस एका रात्री पोटात दुखू लागल्याने मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला बापाच्या अत्याचाराची सर्व कहाणी सांगितली. या 16 वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.
ही सर्व माहिती डॉक्टरांनी पोलिसांना काळवल्यानंतर संबंधित आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. पंत नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून नरधमाला ताब्यात घेतले आहे. तर मुलगी आणि बाळ रुग्णालयात आहेत.