औरंगाबाद - विधान परिषदेच्या निवडणुकीत मी उमेदवार नसेल, दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. मी उमेदवारी निवड प्रक्रियेचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ती प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची औरंगाबादेत होणारी सभा विक्रमी होणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
शहराचे नाव संभाजीनगरच होणार - शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत करत भाजपने टिका केली आहे. मात्र शहराचे नाव दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच बदलले आहे. त्यामुळे नव्याने बदलण्याची गरज नाही. आम्ही आमच्या बोलण्यात, बॅनरवर, आचरणात संभाजीनगर असा उच्चार करतो. आता कागदोपत्री देखील लवकरच होईल. त्यात प्रशासकीय पातळीवर काही प्रक्रिया असते, काही लोक न्यायालयात देखील जातात. ते होत राहील मात्र शहराच नाव संभाजीनगर असेल ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
सभेसाठी जय्यत तयारी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विक्रमी होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानात याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या विक्रमी सभा झाल्या. त्यांनी आपल्या विचारांची भुरळ घातली आहे. या मैदानावर शिवसेना आपलेच विक्रम मोडत राहील, नवीन विक्रम सेनेचेच होतील अस सुभाष देसाई यांनी सांगितले.
हेही वाचा - MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी