मुंबई - पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी प्लास्टिक बंदीवरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उलट पलटवार केला. मला प्लास्टिकचा राक्षस गाडायचा आहे, येत्या 8 दिवसात कारवाईचे परिणाम दिसतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवस प्लास्टिकचा वापर बंद झाला. मात्र आता सर्रासपणे प्लास्टिक वापर सुरू झाला आहे. सरकार प्लास्टिक बंदीसाठी काय भूमिका घेणार ? असे म्हणत अजित पवार यांनी कदमांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे कारवाई थोड्या दिवस थांबावली होती. मात्र येत्या 8 दिवसात परिणाम दिसतील, असे कदम म्हणाले.
प्लास्टिक बंदीची मुदत वाढणार नाही. मला प्लास्टिकचा राक्षस गाडायचा आहे. राज्यातील 80 टक्के प्लास्टिक गुजरातमधून येते. गुजरातमधे प्लास्टिक बंदीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या तारांकीत प्रश्नावर उत्तर दिले.
या चर्चेत अजित पवार म्हणाले, अचानक प्लास्टिक बंदीने नागरिक घाबरले होते. आता सर्रास प्लास्टिक वापर वाढला आहे. त्यानंतर रामदास कदम म्हणाले, लोकसभा आचारसंहितेत प्लास्टिक विरोधी कारवाई थांबली होती. पुढील आठ दिवसात कारवाईचे परिणाम दिसतील. मनिषा चौधरी या आमदारांच्या मुलाने प्लास्टिक उद्योग सुरु केला होता. त्यांच्या पुनर्ज्जीवनाचा प्रस्ताव समितीकडे देऊन विचार करु असेही रामदास कदम म्हणाले.
- ५ जून २०१९ पर्यंतची प्लास्टिकबंदीची कारवाई
- ६३७९ दुकाने / आस्थापना कारवाई
- ४ कोटी १२ लाख २० हजार ८७५ रुपये इतका दंड गोळा
- ८ लाख ३६ हजार ८७५ किलोग्राम प्लास्टिक साठा जप्त
- २७३ कारखाने उत्पादन बंदी; ४ लाख, २० हजार रुपये दंड आणि २ लाख ४१ हजार ६७० किलो प्लास्टिक जप्त