मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात मंदिरे सुरू करण्यासाठी केलेले आंदोलन यशस्वी झाले. या नंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही आक्रमक झाले आहेत. 8 सप्टेंबरपर्यंत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा अन्यथा 9 सप्टेंबरला रिपब्लिकन पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन करू, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली. आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून येत्या 8 सप्टेंबरपर्यंत मंदिर मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत, अन्यथा 9 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज आठवले यांनी आज दिला आहे.
सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे नाही. आता अनलॉकचे नियम जाहीर झाले असून आतापर्यंत मॉल्स उघडण्यास ही परवानगी दिली आहे. 100 लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांना केंद्र सरकारने परवानगी दिल्याची मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सुरक्षेचे नियम, फिजिकल डिस्टन्स पाळून, पोलीस बंदोबस्त ठेवून सकाळी 8 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व धर्मीयप्रार्थनास्थळे येत्या दि. 8 सप्टेंबरपर्यंत सुरू करावीत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. जर 8 सप्टेंबरपर्यंत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केली नाहीत तर रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रामदास आठवले यांनी आज दिला.