मुंबई - काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत निवडणुकांचे पर्व सुरू आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे सुद्धा प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवत आहेत. परंतु, या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला असून, नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - म्हाडा सोडतीमधील विजेत्यांना पैसे भरण्यास मुदतवाढ
मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रांत पाटील यांनी नवी मुंबईतील वाशी येथे सोमवार, ६ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच, कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी? याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी 'वरून दबाव' आहे. तसेच, या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल. मदत न केल्यास त्याचेही 'फळ' मिळेल, अशा भाषेत महावितरण चे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते.
या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश करून संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजिवांना निवडणुकीत कसे सहाय्य करावयाचे आहे, याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.
राज्यभर भाजयुमो करणार आंदोलन?
विक्रांत पाटील यांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरणची यंत्रणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजिवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रिपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
हेही वाचा - ST Workers Strike : संप सोडून १८ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर, १५१ आगार बंदच