मुंबई - उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
जाहिराती करून सत्यापासून लांब-
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीत मृतदेह आढळले आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेत आढळलेत. याठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, हे या घटनेवरून दिसून येत आहे. बिहारमध्ये चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. लोक दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेत जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेत नदीत टाकत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले. उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
..तर अनेकांचे जीव वाचले असते -
भाजपा सरकार उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनाच्या जाहीरातीवर भरमसाठी पैसे खर्च करतंय. त्यांनी इथं पैसे खर्च करण्याऐवजी तो पैसा आरोग्य सुविधा वाढवण्यावर खर्च केला असता, तर अनेक जणांचे जीव वाचले असते, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल