मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (रविवारी) औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असल्याचा दावा केला. मात्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi ) समाधी संभाजीराजे यांनी बांधून ठेवली होती. मात्र ती काळाच्या ओघात दुर्लक्षित झाली. या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी लोकमान्य टिळक ( Lokmanya Tilak ) यांनी काही निधी जमा केला होता. मात्र जीर्णोद्धार झाला नाही, असे पत्र जितेंद्र आव्हाड ( minister Jitendra Awhad ) यांनी ट्विट केले आहे. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बाहेर काढली. त्यावेळी ब्रिटिशांकडून रायगडावर जाण्याची बंदी घालण्यात आली होती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून एक पत्र ट्विट : ब्रिटिश आणि छत्रपती शिवाजी समाधी जीर्णोद्धार समितीने मिळून 1926 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजीराजे यांनी बांधून ठेवली होती, असा या पत्रात दाखला देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला. पेशव्यांनी छत्रपतींच्या समाधीकडे दुर्लक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी बांधण्यात आली. मात्र त्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मोगलानंतर या किल्ल्यावर पेशव्यांची सत्ता होती. 1773 ते 1818 पर्यंत समाधीचा कुठलाही उल्लेख दिसत नाही. पेशव्यानी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे दुर्लक्ष केल्याचा इतिहास सांगत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
'शिवमुद्रा वापरणे म्हणजे शिवद्रोह' : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची मुद्रा फक्त त्यांच्या पुरती मर्यादित ठेवली होती. राज्याच्या केलेल्या कारभारावर किंवा त्यांच्या केलेल्या कामाबाबत ते शिवमुद्रा उमटवत होते. शिवमुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. मात्र शिवमुद्रा आता वापरली जातेय. त्यामुळे शिवमुद्रा वापरणे म्हणजे शिवद्रोह असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
'बाबासाहेब पुरंदरे फिलॉसॉफर नव्हते' : बाबासाहेब पुरंदरे हे फिलॉसॉफर नव्हते. बाबासाहेब पुरंदरे हे फिलॉसॉफर नव्हते तर ते कादंबरीकार होते. ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई साहेबांची विटंबना केली, असल्याचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांचा मृत्यूनंतर आपण कधीही जेम्स लेनचा विषय काढला नाही. माणूस जिवंत असेपर्यंत वैचारिक संघर्ष करायचा असतो, असेही यावेळी आव्हाड म्हणाले. भारतात ज्यांनी खरा इतिहास लिहिला त्यांचे खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण पुरंदरेंनी इतिहास नाही तर कादंबरी लिहिली आहे. कादंबरी इतिहास नसते इतिहास हा जातीचा धर्माचा नसतो, असा टोमणाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. तसेच इतिहासाशी खेळू नका, त्यामुळे कालांतराने वेगळे वाद निर्माण होतील, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
हेही वाचा - Shivaji Maharaj Samadhi Controversy : 'लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीत भ्रष्टाचार केला'