मुंबई - कपिल वाधवान यांना परवानगी देणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्याचे पत्र गृहमंत्री अनिल देशमुखांकडे गेले. त्यानंतर लगेच याची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शिवाय तातडीने संबधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. ही कारवाई होत असताना आपण मात्र झोपेत होतात असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे. वाधवान प्रकरणी भाजपकडून पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे, त्यावर आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
कोणी एक अधिकारी एखाद्याला पत्र देतो आणि ते लोक महाबळेश्वरला जातात. मात्र, यात शरद पवारांचा कोणताही संबंध नाही. भाजपवाले मात्र यात राजकारण करण्यासाठी पवारांते नाव गोवत आहेत. यामध्ये पवारांचा काय संबंध आहे ? असा प्रतिप्रश्न त्यांनी भाजपनेत्यांना केला आहे. शिवाय मागील पन्नास वर्षात तुम्ही फक्त आरोपच करत आला असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
हेही वाचा... लॉकडाऊन डावलून उद्योगपती वाधवान महाबळेश्वरमध्ये; गुन्हा दाखल
वाधवान यांच्या संदर्भातील पत्र कळताच सरकारकडून तातडीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे इतके सक्षम आमचे शासन आहे. हे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, परंतु आमचे भीष्माचार्य हे शरद पवार आहेत. त्यामुळे आम्ही कोणाचे फालतू लाड करत नाही, असा खुलासा आव्हाड यांनी केला.
'केंद्राचे काल एक पत्र मिळालेले आहे. त्या पत्रात आमच्या परवानगीशिवाय पीपीटी कीट, मास्क आणि कुठलेही सामान घ्यायचे नाही. पीपीटी किट नाही म्हणून लोक मरताहेत, मास्क आणि इतर साहित्य नाही म्हणून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये लोक काम करणार नाहीत, म्हणून सांगतात त्यामुळे अनेक डॉक्टर वैतागलेले आहेत. परंतु यासाठी आम्ही अजूनपर्यंत तोंड बंद ठेवले होते. आम्हाला यादरम्यान राजकारण करायचे नव्हते. परंतु आता भाजपने बोलावे की केंद्रानेही असे का केले' असा सवालही आव्हाड यांनी भाजपला केला आहे.
हेही वाचा... गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा;भाजप नेते आक्रमक
महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात काही किंतु आहे का, असा सवाल करत राज्यातील भाजप हे परिपत्रक ताबडतोब मागे घ्या, असे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेईल का ? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. आम्हाला लोकांचे जीव वाचवायचा आहेत. परंतु केंद्राने आम्हाला अनेक वस्तु विकत घेण्यासाठी आणि आणण्यासाठी आडकाठी घातली आहे. त्याची उत्तरे भाजपने द्यावीत, अशी मागणी आव्हाड यांनी केली.