मुंबई - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का असून शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आमदार संपर्काच्या बाहेर असल्याने बोलावली बैठक -गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत. काल सायंकाळपासूनच ते गायब आहेत. आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाकरे आणि शिंदेमध्ये झाला होता वाद - शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. त्या दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज होते. वर्धापनदिनी नाव असतानाही त्यानी मार्गदर्शन करण्यास नकार दिला होता. शिंदे गटांमध्ये यावरून दोन दिवस खदखद सुरू होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे निकटवर्तीय बारा आमदार झाले गायब आहेत. शिंदे यांना शिवसेनेकडून सातत्याने संपर्क साधला जातो आहे. परंतु, शिंदे यांचे मोबाईल बंद असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.
आज पुन्हा बैठक - मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचे भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती.