मुंबई - कोरोनावर मात करण्यासाठी रामबाण औषध आणल्याचा दावा करत पतंजलीने कोरानील हे औषध पत्रकार परिषदेत सादर केले. मात्र, काही दिवसातच या दाव्यातील फोलपणा सिद्ध झाल्यानंतर युटर्न घेतलेल्या पतंजलीला राज्य सरकारने दुसर्यांदा दणका दिला आहे.
पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत रामदेवबाबांनी करण्याची या औषधाची घोषणा केल्यानंतर राजस्थान उत्तराखंड आणि महाराष्ट्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता. कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही असा पवित्रा पतंजलीने घेतला होता.
याप्रकरणी जनतेची दिशाभूल फसवणूक आणि बनवाबनवीबद्दल रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि डॉ. बलबीर सिंग तोमर यांच्यावर 420 कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही औषधाला राज्यात परवानगी दिली जाणार नाही असा इशारा ताबडतोब दिला होता.
या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.
कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.