मुंबई - एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी 9 जून 2017 रोजी संप पुकारला होता. एसटी डेपोतून एकही बस रस्त्यावर उतरली नाही. अशा संपकालीन वातावरणात एसटीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन एसटी रस्त्यावर चालवली. अनिता पाटील आणि जयश्री राऊत असे त्या महिला रणरागिणींची नावे आहेत. या दोन जिगरबाज महिलांचा आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खेड्या-पाड्यात सेवा देणाऱ्या लालपरीने आज 71 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने मुंबईतील गोकुळदास तेजपाल सभागृहात एसटी महामंडळाचा 71 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूर आगारातील वाहक अनिता पाटील आणि जयश्री राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संप काळात कर्मचाऱ्यांना न जुमानता या दोन्ही महिलांनी कोल्हापूर ते पुणे अशी बस चालवली. संप कालावधीत एकूण 51 फेऱ्या चालवल्या. त्यातून 2 लाख 30 हजार रुपये महसूल एसटी महामंडळाला उपलब्ध करून दिला.