मुंबई - नवाब मलिक यांच्यावर सुडाचे राजकारण केले जात आहे. म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न येत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal talk on nawab malik resignation ) यांनी सांगितले. नवाब मलिक याना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
हेही वाचा - Nawab Malik Arrested : नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोजचा तलवार नाचवून जल्लोष
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर, काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार हे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवार, छगन भुजबळ महा विकास आघाडीचे नेते यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, असे ठरल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
आजच्या प्रकरणानंतर देशभरातून विविध नेत्यांनी शरद पवार यांना फोन केल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा शरद पवार यांना फोन केला. तर, छगन भुजबळ यांनी सांगितले की, हे प्रकरण जुने असून तीस वर्षांपूर्वी झालेल्या प्रकरणाचा आता नव्याने तपास सुरू करण्यात आला असून, सुडाच्या भावनेने नवाब मलिक यांना हटविण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भामध्ये उद्या सकाळी दहा वाजता मंत्रालय जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सर्वपक्षीय महा विकास आघाडीचे आमदार मंत्री एकत्र बसून याचा निषेध करणार असून, परवापासून राज्यभर जिल्हा व तालुकास्तरावरसुद्धा याचा निषेध करण्यात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईने कोविड लसीकरणाचा २ कोटींचा टप्पा ओलांडला; मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन