मुंबई - राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प (MH Budget 2022) मांडला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे, असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी वर्गाकडे विशेष लक्ष दिले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदानाची घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
कोविड सारख्या महामारीवर मात करून राज्याच अर्थचक्र रुळावर आणत महाविकास आघाडी विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महापुरुषांशी संबंधित १० शाळांचा विकास करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे खानवडी पुणे, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव खंडाळा, शाहु महाराज यांचे जन्मस्थान कागल,अन्नाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, येथील शाळांचा विकास राज्यसरकार करणार असल्याची बाब देखील कौतुकास्पद आहे. जगाची अर्थ व्यवस्था कोलमडली पण आपल्या राज्यात मात्र कोणत्याही गोष्टीची कमी महाविकास आघाडी सरकारने जाणवू दिली नाही. याउलट या दोन वर्षांच्या कालावधीत राज्याने प्रगतीच केली आहे असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा कालच १२५ वा स्मृतिदिन साजरा झाला. फुले दांपत्याने समाजासाठी घेतलेले अविरत कष्ट आणि त्यांचे कार्य समाजात पोहचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने फुले दांपत्याचे निवासस्थान असलेले "फुलेवाडा" या राज्य संरक्षित स्मारकासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत त्यांच्या कोल्हापूर येथील स्मारकाला योग्य तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याच प्रमाणे महाराणी सईबाई आणि संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला व परिसर विकासाकरिता सन २०२२-२३ मध्ये १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ६ किल्ल्याना देखील भरघोस निधी देणार असल्याची बाब गौरवास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पोषणद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न, सुरक्षा योजनेअंतर्गत पोषणतत्व गुंणसंवर्धित तांदूळ उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. आजचा अर्थसंकल्प उद्योगांसह शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगारांना दिलासा देणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा असून प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाणारा आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. त्यासाठी राज्याची न्यायालयीन लढाई सुरू असून त्यासाठी समर्पित आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकी २५० कोटी रुपये महाज्योती,सारथी आणि बार्टी या संस्थांना उपलब्ध करून दिले आहेत. याचा फायदा निश्चितपणे समाजातील सर्व घटकांना होणार असल्याचे मतं छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
नाशिकरांसाठी देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद -
नाशिककरांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर १६ हजार ३९ कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु करण्यात आले असून राज्यशासन या प्रकल्पाचा ८० टक्के खर्च उचलणार आहे. त्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने प्रकल्पाला अधिक गती मिळणार आहे.त्याचबरोबर आदिवासी उद्योगांच्या क्लस्टरसाठी २५ कोटींची स्वतंत्र तरतूद अर्थसंकल्पात केल्यामुळे आदिवासी बांधवांच्या उद्योगांना निश्चितच चालना मिळणार आहे आणि नवतरुण उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे.