मुंबई - शेतकरी आंदोलन संदर्भात ट्विट केल्याप्रकरणी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींची घरी जाऊन चौकशी केली जाणार नसून, संबंधित ट्विटची केवळ माहिती घेतली जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा सन्मान राखलाच पाहिजे म्हणत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा - ‘आय लव्ह यू ऋषिकेश...’ म्हणत जळगावातील विद्यार्थिनीची 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या
भाजप केवळ मुद्द्यांच्या शोधात असून त्यांना केवळ राजकारण करण्यात रस असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच शेतकरी उन, पावसाचा मारा सहन करत आंदोलन करत आहेत. यावर काही आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनी सहानुभूतीने ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील कलाकार आणि खळाडू यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट एकाच दिवशी केलं गेलं असून काही ट्विटमध्ये शब्दशः साम्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी. तसेच हे ट्विट कोणाच्या आदेशाने केले आहेत का? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आल्याने या संदर्भात चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
शरद पवार यांच्याबाबत पंतप्रधानांची भूमिका काय?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. कृषी कायद्यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता, मात्र आता ते कृषी कायद्याला विरोध करत आहेत, असे म्हणत पंतप्रधान यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तर आज आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली. त्यामुळे शरद पवार यांच्यासंबंधी नेमकं पंतप्रधानांना काय वाटतंय हे त्यांनाच विचारलं पाहिजे, अशी मिश्किल टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
हेही वाचा - ठाणे : तळोजा एमआयडीसीमधील एका कंपनीला भीषण आग