मुंबई - राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलै या दोन दिवसात पार पडणार आहे. या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही. राज्यात असलेले कोरोनाचे संकट पाहता झालेल्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
केंद्रीय कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, हे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे या कृषी कायद्या संदर्भात सुधारणा कायद्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना देशात मोठा प्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध राज्य सरकारकडे काही समाज सुधारकांनी भेट घेऊन या कायद्यासंदर्भात चर्चा केली, असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
'महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा सुरू'
महामंडळ वाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाला योग्य ती महामंडळे मिळावी, यासाठी चर्चा सुरू असल्याचे यावेळी थोरात म्हणाले. लवकरात लवकर महामंडळाच्या वाटपाबाबत एकमत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्ष आज सत्तेवर आहे. मात्र काँग्रेस पक्ष सत्तेवर आणण्यासाठी असंख्य कार्यकर्ते झिजत असतात. त्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणे ही पक्षाची जबाबदारी असते. त्यामुळे महामंडळ वाटप लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.
'पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत सरकारच्या कामांची चर्चा'
शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. राज्य सरकार कसे काम करत आहे, याबाबत (29 जून रोजी) काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्य सरकारच्या कामात बद्दल चर्चा करण्यात आली, असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष पदाबाबत राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र