मुंबई - ‘लास्ट माईल कनेक्टिव्हीटी’ या तत्त्वामध्ये सुधारणा करुन जगातील अनेक शहरांमध्ये आता चालण्यासाठी सुरक्षित, सुरेख अशा रस्ते बांधणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आलेली तत्त्वे मुंबईतील रस्त्यांसाठी देखील स्वीकारुन यापुढे रस्ते निर्मिती करावयाची आहे. याअंतर्गत प्रारंभी मुंबईतील सर्व वॉर्डांमध्ये किमान एक तरी रस्ता या धर्तीवर बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
लोकांना काय दिले याचा विचार - सुरक्षित रस्ते बांधणी आराखड्याची तत्वे या विषयावर बृहन्मुंबई महापालिकेच्या सुमारे ३४५ अभियंत्यांना मागील आठवडाभरात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशीएटीव्हज् आणि ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशीएटीव्हज् फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्या सहकार्याने महापालिकेने आयोजित केलेल्या या उपक्रमाची सांगता पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्यादी अतिथीगृहात झाली, यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की इमारत बांधणे म्हणजे शहराची ओळख बांधणे होय. मुंबईतील मरिन ड्राइव्हच्या आर्ट डेको प्रकारच्या इमारती त्याचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपण लोकांना काय दिले याचा विचार आतापासून करायला हवा. मुंबईमध्ये पूर्वीचे दैनंदिन १० हजार मेट्रिक घनकचरा निर्मितीचे प्रमाण आता ६ हजार मेट्रिक टनापर्यंत कमी झाले आहे. मुंबईकर नागरिक असे अभिनव उपक्रम यशस्वी करुन दाखवतात, असे ठाकरे यांनी नमूद केले.
रस्ते बांधणीवर विशेष लक्ष - पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईत आता रस्ते बांधणीवर विशेष लक्ष दिले जात आहेत. मुंबईतील रस्ते प्रवास हा किलोमीटरपेक्षा वेळेमध्ये अधिक मोजला जातो. मुंबईतील ७ टक्के नागरिक स्वतःच्या वाहनांचा वापर करुन प्रवास करतात, तरीही इतकी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी समस्येवर मात करण्यासाठी वेगवेगळे मोठे प्रकल्प सध्या वेगाने बांधले जात आहेत. रस्ते बनविणाऱया सर्व यंत्रणांना एकत्र आणून सुधारणा घडवल्या जात आहेत. मात्र हे करताना, रस्त्यांच्या बांधणीमध्ये चांगले आराखडे समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यातून वाहतूक समस्या सुटू शकतात. फक्त वाहनेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक घटकाला रस्त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे, हे सुरक्षित रस्ते बांधणीमागील ध्येय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नागरिकांना चालता येईल असे रस्ते - मुंबईत आकर्षक व शहरी सौंदर्यात भर घालणारे नवीन १०५ बसथांबे उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. आणखी ३६५ थांबे उभारण्याची कार्यवाही सुरु आहे. ब्रिटनमधील लंडन शहरात ९ हजार पैकी ७५ टक्के बस डबलडेकर आहेत. जागतिक वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे की, मेट्रोसारख्या प्रकल्पांपेक्षा बस वाहतुकीमध्ये सुधारणा करणे जास्त फायदेशीर आहे. कारण मेट्रो मार्ग एकदा बांधला की तो वळवता येत नाही. बसचे मार्ग आवश्यकतेनुसार बदलता येतात. ते अधिक लवचिक आणि नागरी हिताचे आहेत. एवढचे नव्हे तर लास्ट माईल कनेक्टिव्हीटी तत्त्वामध्ये सुधारणा करुन आता जवळच्या स्थानकापासून घरापर्यंत नागरिकांना चालता येईल, असे सुरक्षित, सुरेख, सुखद रस्ते बांधणीचा जगात विचार केला जात आहे. त्यातूनच रस्ते सुरक्षिततेची जागतिक तत्वं तयार झाली असून त्यांचा स्वीकार मुंबईत करण्यात येणार आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे, असे ठाकरे म्हणाले. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांच्या विकास नियोजन समितीच्या निधीतून मुंबईतील सुरक्षित रस्ते प्रकल्पासाठी निधी दिला जाईल. प्रत्येक निवडणूक प्रभागामध्ये किमान एक तरी रस्ता या प्रकल्पातून बांधला जावा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.