मुंबई - गोरेगावमधील मोतीलालनगर वसाहतीचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी म्हाडाने नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या अहवालानुसार म्हाडाला या पुनर्विकासातून तब्बल 33 हजार 300 घरे उपलब्ध होणार आहेत. याआधीच्या अंदाजानुसार यातून 20 ते 22 हजार घरे उपलब्ध होतील असे म्हटले जात होते. मात्र आता हा आकडा फुगल्याने ही म्हाडा आणि म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
सात वर्षे पुनर्विकास रखडला
गोरेगाव पश्चिम येथे मोतीलालनगर ही 60 वर्षे जुनी म्हाडा वसाहत आहे. या वसाहतीत अनधिकृत बांधकाम झाले असून याचा वाद उच्च न्यायालयात गेला असून न्यायालयाने एक तर म्हाडाने याचा पुनर्विकास करावा वा ही अनधिकृत बांधकामे पाडून टाकावी असा आदेश दिला. या आदेशानुसार म्हाडा पुनर्विकासाचा आराखडा तयार करत आहे. पण अजून काही पुनर्विकास मार्गी लागताना दिसत नाही. अशात म्हाडाने या प्रकल्पालासाठी 21 हजार कोटी खर्च येणार असून इतका पैसा आमच्याकडे नाही. त्यामुळे निविदा काढत एजन्सीची नियुक्ती करत आम्ही हा प्रकल्प मार्गी लावू, असे न्यायालयाला सांगितले आहे. पण रहिवाशांनी मात्र याला विरोध करत हा बिल्डरला घुसवण्याचा डाव असल्याचे म्हणत याला विरोध केला आहे. न्यायालयाने मात्र यावर पुनर्विकासावर तोडगा काढावा वा अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देऊ असे कालच (4 फेब्रुवारी, गुरुवारी) न्यायालयाने म्हाडा आणि रहिवाशांना सुनावले आहे. आता यावर न्यायालय काय निर्णय घेते हे 18 मार्चला पुढील सुनावणीत समजेल. पण हा पुनर्विकास महत्वाकांक्षी असून तो मार्गी लागवण्याचा प्रयत्न म्हाडाचा आहे.
142 एकर जागेचा होणार पुनर्विकास, नवे शहर उभे राहणार
मोतीलालनगर वसाहत 142 एकरवर वसली आहे. तर येथे मूळ 3700 सदनिकाधारक आहेत. तेव्हा पुनर्विकासाअंतर्गत या 3700 रहिवाशांचे पुनर्वसन करत येथे 20 ते 22 हजार अतिरिक्त घरे म्हाडा उपलब्ध होतील, असे म्हटले जात होते. पण आता मात्र येथे 33 हजार 300 घरे उपलब्ध होणार असल्याचा अहवाल मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी नेमलेल्या सल्लागाराच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तर याला म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दुजोरा दिला आहे. चार एफएसआयनुसार 142 एकरचा पुनर्विकास होणार असल्याने येथे एका वेळी इतक्या मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 142 एकर वर एक नवीन शहरच उभे राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
'घरघर' लागलेल्या म्हाडाला पुनर्विकास हीच आशा
मुंबईत घरे बांधण्यासाठी म्हाडाकडे जागाच नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून मुंबई मंडळाच्या लॉटरीतील घरांचा आकडा 10 हजारांवरून एक हजारांच्या घरात आला आहे. मागील दोन वर्षात तर मुंबई मंडळाला चांगली 'घरघर' लागली आहे. शोधून ही घरे उपलब्ध होत नसल्याने दोन वर्षांपासून मुंबईतील घरांची लॉटरी निघालेली नाही. तर सध्या गोरेगावमधील कुसुम शिंदे भूखंडावरील सुरू असलेला गृहप्रकल्प वगळता मंडळाकडे एकही मोठा प्रकल्प नाही. अशावेळी आता मुंबई मंडळाच्या सर्व काही आशा या पुनर्विकासावरच आहे. टागोर नगर, कन्नमवारनगर, मोतीलालनगर यासारख्या पुनर्विकासातून मंडळाला भविष्यात मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार आहेत. तर बीडीडी चाळ हा ही महत्वाकांक्षी प्रकल्प म्हाडासाठी असणार आहे. कारण यातून ही मुंबई मंडळाला हजारो घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता मंडळाचा मोर्चा हा रखडलेले पुनर्विकास मार्गी लावायचे आणि नवीन पुनर्विकास प्रकल्प हाती घ्यायचे याकडेच दिसून येत आहे.