मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासातील 269 रहिवाशांना दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी खुशखबर दिली आहे. पुनर्विकासाच्या इमारतीमधील 269 फ्लॅटच्या (घरांसाठी) लॉटरीसाठी 29 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात येईल, असे मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाचे मुंबई मंडळ करत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम सुरू आहे. मंडळाने 269 रहिवाशांची पात्रता निश्चित करून त्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे. या 269 रहिवाशांना पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसनाची पूर्णतः खात्री मिळणार आहे. कारण पुनर्वसन इमारतीतील त्यांचे घर लॉटरीच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर या 269 रहिवाशांना नवीन घराचा स्वप्न साकारणे शक्य होणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी याला दुजोरा दिला आहे. पण, त्याचवेळी हा अंदाजित मुहूर्त असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
रहिवाशांना वेबसाईटची लिंक देण्यात येणार-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन पध्दतीने लॉटरी काढण्यात येणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही मोठा सोहळा होणार नाही. रहिवाशांना म्हाडात लॉटरीसाठी बोलावले जाणार नाही. लॉटरीसाठी 269 रहिवाशांना एक वेबसाईटची लिंक दिली जाईल. या लिंकच्या माध्यमातून त्यांना ऑनलाइन लॉटरीत सहभागी होता येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ही ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार असल्याचे समजते आहे.
रहिवासी कृष्णकांत नलगे यांची याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली. नलगे म्हणाले, की पुढील आठवड्यात लॉटरी होणार असल्याचे कानावर आले आहे. पण, अद्याप निश्चित तारीख आम्हाला कळवण्यात आली नाही. लवकरच लॉटरी होणार आहे. आम्हाला पुनर्वसनाची हमी मिळणार आहे. ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. लॉटरी काढण्यासाठी 29 ऑक्टोबरच्या तारखेवर सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.