मुंबई - कोरोना आणि टाळेबंदीने गाळ्यांच्या (दुकान) ई-लिलावातील विजेत्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला आहे. आमची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आता आम्हाला हे गाळे घेता येणार नाही, असे पत्र ई-लिलावातील विजेत्यांनी म्हाडाला दिले आहे. ही माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी जीवन गलांडे यांनी दिली आहे.
म्हाडाच्या प्रत्येक गृहप्रकल्पात काही व्यावसायिक गाळे बांधली जातात. तर ही गाळे बांधणे बंधनकारक आहे. रहिवाशांच्या सोयीसाठी त्यांना भाजी, पीठ, औषध आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे गाळे असतात. तर या गाळ्यांची ही लॉटरी काढली जाते. फक्त ही लॉटरी वेगळ्या पद्धतीने पार पडते. प्रत्येक गाळ्याची किंमत निश्चित करत या गाळ्याचा लिलाव केला जातो. निश्चित किंमतीपेक्षा अधिक किंमत देणाऱ्याला गाळा वितरित केला जातो. अशाप्रकारे आतापर्यंत शेकडो गाळे मुंबई मंडळाने वितरित केले आहेत. दरम्यान 2010 नंतर थेट 2 जून 2019 ला मंडळाने 134 गाळ्यांची ई-लिलाव केला. यामध्ये मुंबईसह विविध ठिकाणी असलेल्या 38 लाखांपासून ते कोटीच्या दुकानांचा ई-लिलाव करण्यात आला. लाखो कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. तसेच शेकडो नागरिकांना निवासी गाळ्यांच्या लिलावातून म्हाडाने जगण्याचे साधनही उपलब्ध करून दिले आहे.
मुंबई व्यावसायिक गाळे अर्थात दुकान घेणे म्हणजे अत्यंत अवघड आहे. मुंबईतील मालमत्तेच्या किमती लक्षात घेता सर्वसामान्य दुकान घेण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. पण म्हाडाच्या या ई-लिलावात परवडणाऱ्या दरात गाळे उपलब्ध होत असल्याने या ई-लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 134 जण विजेते ठरले. या विजेत्यांची पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. त्यांना गाळे वितरीत करण्यात येत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर वितरणाला वेग येईल असे वाटत असतानाच गाळे परत केले जात असल्याची बाब समोर आली आहे. 3 गाळे विजेत्यांनी मंडळाला पत्र लिहित गाळ्याचे वितरण रद्द करावे, अशी विनंती केल्याचे मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी गलांडे यांनी सांगितले आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आता आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही दुकान घेऊ शकत नाही. तेव्हा हे वितरण रद्द करावे, असे त्यांनी या पत्रात लिहिल्याचेही गलांडे यांनी सांगितले आहे. कोरोना-टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पैसे भरण्यासाठी विजेत्यांना 15 डिसेंबरपर्यंतची वाढीव मुदत दिली आहे. पण तरीही विजेत्यांना आर्थिक अडचणी असल्याने ते गाळे परत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.