मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणाचे पडसाद आज झालेल्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीमध्येदेखील उमटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप बैठकीत खोडून काढले. तसेच मी कधीही मुंबई पोलीस आयुक्त किंवा इतर कोणाला इतर कोणाला पैसे जमा करायला सांगितले नव्हते, अशा प्रकारचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांसमाेर दिले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही दुपारी जवळपास साडे तीनला सुरू झाली. मात्र, दीड तासानंतर सर्व मंत्र्यांनी आपले सहकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना सभागृहाच्या बाहेर जायला सांगितले. त्यानंतर केवळ मंत्र्यांची बैठक पार पडली. सध्या काही अधिकाऱ्यांमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे अधिकार्यांसमोर या बैठकीत चर्चा करणे सर्व मंत्र्यांनी टाळले.
हेही वाचा-व्हॉट्सअपला धक्का! गोपनीयतेच्या धोरणाचा सीसीआय करणार सखोल तपास
रश्मी शुक्ला यांच्यावर सर्व मंत्र्यांनी व्यक्त केला संताप
बैठकीत सर्वच मंत्र्यांनी फोन टॅपिंगबद्दल संताप व्यक्त केला. तसेच जर अशाप्रकारे फोन टॅपिंग होत असेल तर मंत्र्यांनी काम कशी करावी? अशा प्रकारचा प्रश्नदेखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आला. फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण काम करतोय त्याच अधिकाऱ्यांवर विश्वास राहील का? असादेखील प्रश्न काही मंत्र्यांनी या बैठकीत बोलून दाखविला. मात्र, हे फोन टॅपिंगसाठी राज्य सरकारने करायला सांगितले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हे फोन टॅप केले असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर दिली.
हेही वाचा-वाधवान पिता-पुत्रांचा आणखीन कारनामा उघडकीस; सीबीआयकडून गुन्हा दाखल
बैठकीत कोण काय म्हणाले?
ज्याप्रकारे विरोधक फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर आता राज्य सरकारनेदेखील उत्तर देण्याची गरज असल्याचा सूर बैठकीमध्ये पाहायला मिळाला. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे, अशा प्रकारचा बैठकीत वक्तव्य केले. तर तिथेच नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांचे या प्रकरणावरील सर्व आरोप राज्य सरकारने खोडून काढले पाहिजेत असे मत व्यक्त केले. तर मंत्र्यांचेदेखील फोन टॅप होत असल्याची शंका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली. तसेच फोन टॅप होत आतील तर मंत्री काम कसे करू शकतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा केल्याचा आरोप पत्रातून केला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले. परमबीर सिंग यांच्या पत्राची दखल घेण्याची विनंती विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली.
रश्मी शुक्ला यांना फोन टॅप करण्याची वाईट सवय-
जितेंद्र आव्हाड बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना फोन टॅप करण्याची वाईट सवय आहे. त्यांना कोणाचेही फोन टॅप करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली नव्हती. तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी परवानगी नाकारण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुळात फोन टॅप करण्यापूर्वी सविस्तर माहिती द्यायला हवी होती. ती दिली नाही. नोकरशहाच्या नावाचा वापर भाजप कुंभाड रचत आहे.