मुंबई - तब्बल सात महिन्यानंतर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 सोमवार पासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. लोकलच्या मर्यादा आणि कोरोनाची भीती लक्षात घेता मेट्रोचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने हजारो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनासंबंधीचे नियम पाळताना मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ला अनेक बदल करावे लागले आहेत. त्यानुसार, आता मेट्रोच्या फेऱ्या कमी होणार असून मेट्रोची प्रवासी क्षमता थेट 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. आधी दररोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेअकरापर्यंत धावणारी मेट्रो आता मात्र सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ, अशी 12 तासाचं सेवा देणार असल्याची माहिती एमएमओपीएलने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी कमी करत फिजिकल डिस्टनसिंग पाळता यावी, यावर एमएमओपीएलने विशेष भर दिला आहे. त्यामुळेच मेट्रो गाड्यांमधील प्रवासी क्षमता 50 टक्के करण्यात आली आहे. एका डब्यात 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
हेही वाचा- LIVE : मुसळधार पावसानंतर मुंबई-पुण्यासह राज्यातील परिस्थिती
18 तासांऐवजी 12 तास सेवा
मेट्रोतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने मेट्रोच्या फेऱ्याही बऱ्यापैकी असतात. अगदी पहाटे साडे पाचला पहिली मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होते. तर रात्री साडेअकरा पर्यंत प्रवाशांची ने-आण करते. 18 तास मेट्रो 1 सेवा देत होती. पण आता सोमवारपासून ही सेवा 12 तास सुरू असणार आहे. त्यानुसार आता मेट्रो पहाटे साडेपाच ऐवजी सकाळी साडेआठ वाजता सुरू होईल. तसेच, रात्री साडेअकरा ऐवजी साडेआठपर्यंत सेवा देईल. त्यामुळे साहजिकच मेट्रोच्या फेऱ्या कमी असणार आहेत. याविषयी एमएमओपीएला विचारले असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल आम्ही केले आहेत. त्यानुसार फेऱ्या कमी केल्या आहेत. पण पुढे अंदाज घेत, प्रवाशांच्या मागणी-गरज लक्षात घेत नक्कीच फेऱ्या, वेळ वाढवण्यात येणार असल्याचे एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा- LIVE : मुंबईला रेड अलर्ट... शहरासह उपनगरात पावसाचा जोर ओसरला