मुंबई - राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वादात मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) चे कारशेड रखडले आहेच. पण त्याचवेळी मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), मेट्रो 4 (वडाळा-कासारवडवली) आणि मेट्रो 14 चे सुरूवातीचे स्थानक ही रखडले आहे. कांजूरमार्ग येथील जागेवरील मेट्रो 3 च्या कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही कामे रखडली असून याचा मोठा फटका प्रकल्पाला बसत आहे. हीच बाब लक्षात घेता आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मेट्रो 6 कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने गोरेगाव पहाडी येथील जागा मिळावी यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे.
मेट्रो 6 साठी 2018मध्ये दिली होती जागा
स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी असा मेट्रो 6 मार्ग एमएमआरडीएकडून बांधला जात आहे. या मार्गाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गासाठीचे कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला हस्तांतरीत केली. या जागेवर कारशेड उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या एमएमआरडीएने घेतल्या. दोन महिन्यांपूर्वी माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात करत हे काम पूर्ण केले. तर आता पुढील कामाला सुरुवात झाली असतानाच न्यायालयीन स्थगितीमुळे या कामालाच ब्रेक लागला आहे.
मेट्रो 3 च्या वादाचा फटका मेट्रो 6 ला
मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद गेली 7 वर्षे सुरू आहे. आरेमध्ये यासाठी कारशेड बांधण्यात येत होते. पण याला जोरदार विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरला हलवले. पण आरेतून कांजूरला कारशेड हलवण्याचा निर्णय भाजपाला मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी या जागेला विरोध केला. त्याचवेळी या जागेवर केंद्र सरकार-खागसी बिल्डरांनाही मालकी दावा केला. हा वाद थेट न्यायालयात गेला. न्यायालयाने कामालाच स्थगिती दिली. मुळात ही जागा मेट्रो 6 साठी दिली होती. 2018 मध्ये ही जागा दिली असताना यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. मात्र मेट्रो 3 चे कारशेड याच जागेवर हलवल्यानंतर तात्काळ वादाला सुरुवात झाली. या जागेवर केंद्र आणि खासगी बिल्डरांनी दावा केला. प्रकरण न्यायालयात गेले. भाजपाकडून ही जागेबाबत अनेक आक्षेप घेण्यात आले. भाजपा काळातच मेट्रो 6 साठी जागा दिली गेली असताना ही आता यावरून वाद सुरू करण्यात आल्याने आश्चर्य ही व्यक्त होत आहे.
गोरेगावचा पर्याय पुढे
मेट्रो 3 च्या वादाचा फटका मेट्रो 6 ला बसला आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कामाला स्थगिती देण्यात आली आहे. तर ही स्थगिती कधी उठणार आणि वाद कधी संपणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एमएमआरडीएसमोर मेट्रो 6 च्या डेडलाईनचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातुनच त्यांनी आता न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. यातुनच पहाडी गोरेगाव येथील जागेचा पर्याय समोर आणला आहे. ही जागा मिळावी यासाठी आता एमएमआरडीएने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहीत या जागेची मागणी केल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याविषयी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.
हेही वाचा -जलक्रीडा, नौकानयन, पर्यटनस्थळी मनोरंजनाच्या इनडोअर कार्यक्रमांना परवानगी
हेही वाचा - अंबाबाई आणि जोतिबा चरणी यंदा तब्बल 'इतक्या' किंमतीचे दागिने दान