मुंबई - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 आणि दहिसर ते डी एन नगर मेट्रो 2 'अ'चा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल अशी घोषणा आर ए राजीव, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी आज केली आहे. मेट्रो 2 अ मार्गाचा पहिला टप्पा डहाणूकर वाडी ते आरे असा, तर मेट्रो 7 चा दहीसर ते आरे असा असणार आहे. या मार्गावर ऑक्टोबरपासून मुंबईकरांना प्रवास करता येणार असल्याने ही मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र, त्याचवेळी दहिसर ते डी एन नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा मेट्रो प्रवास करण्यासाठी मात्र जानेवारी 2022 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
12000 कोटी खर्च -
पश्चिम उपनगरात अत्याधुनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो 2 अ आणि 7 मार्ग हाती घेतले. त्यानुसार 12000 कोटी खर्च करत 2016 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हे काम पूर्ण करत हे दोन्ही मार्ग डिसेंबर 2020 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार होते. मात्र, 2020 मध्ये कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट उभे ठाकले. त्याचा फटका कामाला बसला. त्यामुळे डिसेंबर 2020 ची डेडलाईन चुकली. 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्याचाही फटका कामाला बसला आणि मे 2021 चीही डेडलाईन चुकली. आता डिसेंबर 2021ची डेडलाइनही गेली आहे. कारण आता कामाला आणखी विलंब झाल्याने जानेवारी 2022 ची नवी डेडलाईन राजीव यांनी दिली आहे. मात्र, त्याचवेळी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी टप्प्याटप्प्यात दोन्ही मार्ग सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबर मध्ये मेट्रो 7 चा दहिसर ते आरे असा आणि मेट्रो 2 अचा डहाणूकर वाडी ते आरे असा पहिला टप्पा ऑक्टोबरला सुरू होणार आहे. दोन्ही मार्ग संपूर्णपणे जानेवारी 2022 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे राजीव यांनी सांगितले आहे. दरम्यान 12000 कोटींपैकी 6000 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
सोमवारी ट्रायल रन -
मेट्रो 2 अ आणि 7 हे मार्ग सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा टप्प्याला अर्थात मेट्रो ट्रायल रनला सोमवारी सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दोन्ही मार्गांवर ट्रायल रन होणार आहे. त्यानंतर पुढे ट्रायल रन सुरू राहतील तर दुसरीकडे उर्वरित काम पूर्ण करत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळवत दोन्ही मार्गावरील पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे.