मुंबई/कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या कोल्हापूरमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द -
मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर भागात तुफान पाऊस कोसळला. परिणामी सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. लोकवस्तीत पुराचे पाणी घुसले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी केली. सोमवारी सातारा जिल्ह्याची पाहणी करून आढावा घेण्यासाठी गेले. मात्र, खराब हवमानामुळे माघारी परतावे लागले होते. गुरुवारी कोल्हापूर दौरा करणार होते. हवामान खात्याकडून दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोल्हापूरला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यापुढे एक नवे संकट उभे राहिले असून मुख्यमंत्री ठाकरे यांचा कोल्हापूर दौराही रद्द करण्यात आला आहे.