मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 6 मार्च 2022 रोजी मेगाब्लॉक ( Mega blocks ) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे ( Central Railway zone ) मार्गावरील दिवा ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ( CSMT ) ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या ( Western Railway zone ) चर्चगेट ते मुंबई सेंट्रल डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक मध्य रेल्वे मेगाब्लॉक - मध्य रेल्वेमार्गावरील दिवा ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत ठाणे येथून सकाळी 8.37 ते सायंकाळी 4.36 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/ अर्धजलद सेवा दिवा आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा डोंबिवली स्थानकात थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानांवर पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-
हार्बर रेल्वे ( Harbour line ) मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई/ वडाळा रोड स्थानकातून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष म्हणजे या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक-
रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप- डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक मुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेली आहे.