मुंबई - मध्य रेल्वे रविवार दि. १७ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार ( Mumbai Local Mega block ) आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील व १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानावर पोहोचतील. तर कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील, पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील, अशी माहिती ही रेल्वे विभागाने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द - पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापी, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगाब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे देखील मध्यरेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.