मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्राच्या ( KCR Visit To Maharashtra ) दौऱ्यावर येणार असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रादेशिक अस्मिता वाचवण्याचा ( Preserve Identity of Regional Parties ) आणि एकसंघ होऊन मोदींना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असले तरी गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छा स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ नरेंद्र मोदी यांना अटक करण्यासाठी ते पुढे आले आहेत. यामागे नरेंद्र मोदी यांचा विरोध हे मुख्य कारण असले तरी स्वतःचा प्रादेशिक पक्ष आणि अस्मिता वाचवण्यासाठी हा सर्व खटाटोप लहान पक्षांनी सुरू केला असल्याची चर्चा आहे.
मोदींचा राष्ट्रीय स्तरावर विरोध -
या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर म्हणाले की, केसीआर हे मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी युथ काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी काम केले आहे. त्यांच्याबरोबर चंद्राबाबू नायडू हेसुद्धा होते. मात्र, या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि अस्मिता जपण्यासाठी वेगळ्या वाटा निवडल्या दोघांचाही त्या दिशेने प्रवास सुरू झाला. चंद्राबाबूनी तेलुगु देसमच्या माध्यमातून सत्ता मिळवली होती, तर आपल्याला सत्ता मिळवायची असेल, तर तेलंगणा राज्याची अस्मिता जोपासली पाहिजे, हे केसीआर यांच्या लक्षात आले. तुलनेने मध्यमवयीन असलेल्या केसीआर यांनी ही राजकीय चळवळ तेलंगणात सुरू केली आणि वाढवत नेली. त्यामुळे त्यांचे नेतृत्व पुढे आले. या आंदोलनात सुमारे हजार लोक मारले गेले. मात्र, काँग्रेसची असलेले जुने संबंध आणि संपर्क यांची सांगड घालत केसीआर यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधला. स्वतंत्र तेलंगणा राज्य दिल्यास तुमच्यासोबत राहू असे, आश्वासन त्यांनी काँग्रेसला दिले. त्यांच्या या प्रस्तावाला 2014मध्ये यश आले. तेलंगणा राज्य वेगळं केलं तर भविष्यात आपल्याला उपयोग होईल म्हणून काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या विभाजनाला मान्यता दिली. या पट्ट्यात वायएसआर हे काँग्रेसच्या बाजूने होते. मात्र, ते गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी केसीरच्या मदतीने भरून निघेल, असे काँग्रेसला वाटले. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि नरेंद्र मोदी सत्तेत आले. मोदी सत्तेत आल्यानंतर सर्व समीकरणे बदलली काँग्रेस सोबत राहू, असं आश्वासन दिलेले चंद्रा-बाबू आणि केसीआर सुद्धा भाजपकडे सरकले.
'प्रादेशिक पक्षांनी अस्मिता टिकवण्यासाठी लढावे' -
मात्र 2019 नंतर लहान पक्षांच्या लक्षात आले, भाजप एनडीए करायची म्हणून लहान पक्षांना सोबत घेते आणि गिळंकृत करते त्यांनी अण्णा द्रमुक, अकाली दल आणि शिवसेनेसोबत हाच खेळ केला. वन नेशन वन इलेक्शन वन रेशन अशी घोषणा देत प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा सपाटा प्रादेशिक पक्षांच्या लक्षात आला. त्यामुळे मग प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोदींचा विरोध सुरू केला. सर्वात पुढे ममता बॅनर्जी आल्या, त्या त्याआधी वाजपेयी यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिल्या होत्या. त्यानंतर तेलगू देसम आणि शिवसेनेने बंड केल. लहान पक्षांनी उभारलेले बंडाचे निशाण पाहून केसीआर यांनीही जोरदार विरोध सुरू केला. सर्वांनी एकत्र येऊन मोदींना आव्हान दिले, तर आपापल्या प्रदेशात आपले पक्ष वाढवू शकू प्रभाव पाडू शकू याची खात्री या प्रादेशिक पक्षांना आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाढ महाराष्ट्रापुरती आणि केसीआर यांच्या पक्षाची वाढ ही तेलंगणा पुरती मर्यादित असतानाही ते मोदींना विरोध करण्यासाठी एकसंघपने येण्याची भाषा करत आहेत. सुरुवातीला काँग्रेसला बाजूला ठेवून हा प्रयत्न झाला. मात्र, तो शक्य नाही, हे लक्षात येताच या तिन्ही पक्षांनी सेक्युलर पक्षांशी जुळवून घेत आता एकसंघ मोट, फ्रंट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच आता नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये ही मोदींचा जोर कमी झाल्याचे लक्षात येत असल्याने ही तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते, बळकट होऊ शकते, याची जाणीव या प्रादेशिक पक्षांना होते आहे. या दृष्टीने पाहता उद्धव ठाकरे आणि केसीआर यांची भेट ही महत्त्वाची असल्याचे केतकर म्हणाले.
'विरोधी पक्षांचा बेजबाबदारपणा संपायला हवा' -
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा असेल आणि एकसंघ ताकत दाखवायची असेल तर विरोधी पक्षांनी आपला बेजबाबदारपणा सोडायला हवा, असे मत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षांनी आपापले अंतर्गत मतभेद विसरून एकत्रितपणे निकराचा लढा देण्याची हीच वेळ आहे. नेतृत्व कोण करणार यापेक्षा भाजपचा पाडाव कसा होऊ शकतो, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - Raosaheb Danve : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव, हॉटेलचे बिल न देताच गेले परत