मुंबई - काही दिवसांपूर्वीच पश्चिम द्रुतगती मार्गावरील काशीमीरा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका बिबट्या मादीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नॅशनल पार्कमधील बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अखेर आता उद्यान प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. उपाययोजना नक्की काय असतील आणि त्या कशा राबवायच्या यावर चर्चा झाल्याची माहिती नॅशनल पार्कचे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर या बैठकीत प्राणीप्रेमी आणि प्राणी संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत.
1997 ते 2017 दरम्यान 44 बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू
नॅशनलपार्कमध्ये मोठ्या संख्येने बिबटे आढळतात. तसेच इतर वन्यजीवांचेही मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. अनेकदा वन्यप्राणी नॅशनल पार्क परिसरातील रस्त्यावर येतात. तर काहीवेळा शहरी भागातही हे प्राणी येत असल्याचे चित्र आहे. अगदी द्रुतगती मार्गावरही ते वावरताना दिसतात. यावेळी होणाऱ्या अपघातात आतापर्यंत अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. 1997 ते 2017 दरम्यान अपघातामध्ये 44 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
15 नोव्हेंबरला गर्भवती बिबट्या मादीचा मृत्यू
नॅशनल पार्कमधील बिबटे आणि वन्यप्राणी रस्त्यावर येताना दिसतात. त्यात गेल्या काही वर्षात नॅशनल पार्क आणि आरे परिसरात काही विकास प्रकल्प राबवले गेले असून, रस्त्यांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी हे प्राणी या रस्त्यांवर येतात व अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो. असाच एक मृत्यू 15 नोव्हेंबरला झाला होता. नॅशनल पार्कमधील एक बिबट्या मादी काशीमीरा, पश्चिम द्रुतगती मार्गावर आली. यावेळी वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू धक्कादायक आहेच, पण यापेक्षाही धक्कादायक बाब तिच्या शवविच्छेदन अहवालात समोर आली. ती म्हणजे ही मादी गर्भवती होती, आणि तिच्या पोटात तीन पिल्ले होती. म्हणजेच एकूण चार मृत्यू झाले असून, या मादीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच प्राण्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.
मेनका गांधीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
15 नोव्हेंबरला झालेल्या या घटनेची गंभीर दखल माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी घेतली आहे. त्यांनी 18 नोव्हेंबरला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत याविषयी चिंता व्यक्त केली आहे. तर अशा घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. या उपाययोजना काय असतील हेही या पत्रात नमूद केले आहे. या पत्रानंतर नॅशनल पार्क प्रशासनाला जाग आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात असे प्रकार रोखण्यासाठी नेमके काय करता येईल यावर चर्चा करण्यासाठी पहिली बैठक पार पडली आहे. यापुढे यावर आणखी अभ्यास करत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे मल्लिकार्जुन यांनी सांगितले आहे.
'या' असतील उपाययोजना
मेनका गांधी यांनी आपल्या पत्रात रस्ते अपघात रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत नॅशनल पार्क प्रशासन, प्राणी प्रेमी आणि संघटनांनीही काही उपाययोजना सुचवल्या आहेत. या सर्व उपाययोजनाचा विचार करत एक विस्तृत आराखडा तयार करण्यात येईल. त्यावर आधारित उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे मल्लिकार्जुन यांनी सांगितले आहे. त्यानुसार नवीन रस्ते तयार करताना रस्त्याखाली प्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्याची कल्पना समोर आली आहे. नॅशनल पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यावर वाहनांसाठी वेगमर्यादा ठरवण्यात यावी, ती न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. रस्त्यावर आवश्यक त्या सूचना देणारे फलक लावावेत, अशा विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - वेल्ह्यात किरकोळ कारणावरून मुलाची वडिलांना मारहाण; उपचार सुरू असताना मृत्यू
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या चारचाकीने घेतला पेट