ठाणे : मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज एटीएसच्या तपासात वर्तविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एटीएसने हिरेन यांच्या हत्येची थिएरी तयार केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसुख यांच्या हत्येची थिएरी
मनसुख हिरेन यांच्या दुसऱ्या मोबाईलचे लोकेशन वसईजवळील तुंगारेश्वर येथे सापडले आहे. तर पहिल्या मोबाईलचे लोकेशन वसईतील मांडवीत सापडले होते. मनसुख यांची हत्या केल्यानंतर मारेकरी त्यांचा मृतदेह घेऊन वसई आणि परत ठाणे-मुंब्रापर्यंत गेले असावे असा एटीएसला संशय आहे. मनसुख यांचा मृतदेह लांब वाहून जावा यासाठी तोंडावर रुमाल ठेवले असावे. तसेच मनसुख यांची हत्या केल्यानंतर मृतदेह पाण्यात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
सचिन वझेंचा जबाब नोंदविला
या प्रकरणी एटीएसने सचिन वझे यांचा जबाब नोंदवला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओत स्फोटके आढळण्याच्या प्रकरणाचा वझे तपास करत होते. सचिन वझे हिरेनला ठाण्याहून मुंबईला घेऊन आले होते. या सर्व पैलुंच्या अनुषंगाने वझे यांची चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एएनआयकडे देण्यामागे नक्कीच काळंबेरं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे