मुंबई - गोवंडी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रिझवान अब्दुल हमीद जमादार(48)या व्यक्तीने पोलीस तक्रार लिहून घेत नसल्याने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाली असून, त्याचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस तक्रार नोंदवत नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.
शिवाजीनगर रस्ता क्र.14 येथे रिझवान हमीद हा गाडी पार्किंगचा व्यवसाय करतो. त्याचे काही कारणावरून परिसरातील शकील अन्सारी,शमीम अन्सारी व शरिफ अन्सारी यांच्यासोबत वारंवार वाद होत असतात. त्याबाबत कारवाई करावी, या विनंतीसाठी रिझवान दोन-तीन वेळा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला 5 तास ठाण्यातच बसवून ठेवले आणि तक्रार न घेताच घरी पाठवले. मंगळवारी परत सकाळी रिझवान पोलीस ठाण्यात गेला. मात्र, यावेळीही पोलिसांनी काही ऐकले नाही. पुन्हा बसवून ठेवल्यामुळे रिझवान संतापला; आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे पाहून त्याने त्याच ठिकाणी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले.
यावेळी रिझवानला पेटताना पाहून पोलिसांची पळापळ झाली. जे काही मिळेल त्याने पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीने रिझवानला पोलीस गाडीत घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो 40 टक्के भाजला असल्याने पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा धक्कादायक! शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून
आज सकाळी उपचारादारम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने रागात वडिलांनी हे पाऊल उचलल्याची मुलगा तौफीक जमादार याने माहिती दिली आहे. या घटनेबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्र-137/19 अन्वये गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत.