मुंबई - मालाड पठाणवाडी येथे एका लाकडी गोडाऊनला शुक्रवारी सायंकाळी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आगीवर नियंत्रण -
मालाड पठाणवाडी येथे मल्लिका हॉटेल जवळ असलेल्या एका लाकडी गोडाऊनला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली. लाकडी गोडाऊनला आग लागल्याने तसेच हा परिसरात दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाने घटनास्थळी 7 फायर इंजिन, 6 जम्बो टँकर पाठवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून ही आग लेव्हल 2 ची असल्याचे घोषित केले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास म्हणजेच तब्बल 3 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत कोणीतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
दोषींवर कारवाई -
गेल्या दोन महिन्यात मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही आग अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाणामुळे लागली असल्याचा आरोप, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. दरम्यान मुंबईमधील आगीची चौकशी केली जाणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
हेही वाचा - मालाड पठाणवाडी येथे लाकडी गोडाऊनला आग, कोणीही जखमी नाही
हेही वाचा - बिहार निवडणूक : सीमांचलची 'आवाम' ठरवणार बिहारचा 'निजाम'