मुंबई - राज्यात सध्या हिंदुत्व, हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात धार्मिक वातावरण तापवले जात असताना सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने, या वादात न पडता नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देऊन विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला ( MVA Plan For Municipal Elections ) आहे.
तारीख पे तारीख - राज्यात 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामुळे भाजपाकडे सर्वाधिक आमदार असतानाही त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले आहे. गेल्या दोन वर्षात भाजपाकडून सरकार पडेल असे सांगत तारीख पे तारीख दिल्या गेल्या आहेत. त्यानंतरही सरकार पडत नसल्याने आता हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे.
सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न - राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या सोबत गेल्याने त्यांचे हिंदुत्व खोटे असल्याचे दाखवण्यासाठी राजकीय वातावरण तापवले जात आहे. त्यासाठी हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा विरोधकांकडून तापवला जात आहे. धार्मिक वाद पुढे करून महापालिका निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न विरोधकाकांडून केला जात ( Mahavikas Aghadi In Trouble ) आहे.
विकासावर निवडणुका लढणार - एकीकडे धार्मिक वाद तापवला जात असताना महाविकास आघाडीकडून मुंबईत विकासकामे आणि सुशोभीकरण केलेल्या वास्तूंच्या उदघाटने आणि लोकार्पण सुरू आहे. धार्मिक वाद तापला असताना प्रत्येक शहरात महापालिकेत कोणती कामे केली आणि कोणती कामे करणार आहोत याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून निवडणुका लढवणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ( AJit Pawar Revealed MVA Plan ) आहे. यामुळे राज्यात कितीही धार्मिक वातावरण तापवले तरी, महाविकास आघाडी सरकार आणि त्यामध्ये सहभागी राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार हे स्पष्ट झाले ( MVA Preparations For Elections ) आहे.