मुंबई - केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडले. त्यानंतर देशभरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी आंदोलन, बंद, निषेध सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज (11ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याला मुंबईसर राज्यभराता मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी-
रीक्षा आणि बससेवा बंद
रस्त्यावर दिसणारे रिक्षा आणि बस स्टॅन्ड रिकामे दिसत आहेत. तसेच, मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर संख्या घटली आहे. मात्र, मुंबईत काही रस्त्यांवर वाहनांची संख्या दिसत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिसत आहे. रीक्षा आणि बससेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांनी स्वत:ची वाहन रस्त्यावर काढली आहेत.
तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींचा पाठिंबा
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच, हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यातही आले आहे.
काही ठिकाणी विरोध होण्याची शक्यता?
दादर, अंधेरी, वांद्रे या नेहमी गजबज असलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत. मुंबईत दररोज होणारी रस्ते वाहतूक आज देखील कायम आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांचे रोज प्रमाणे असून वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे. यामुळे काही भागांमध्ये व्यापारी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
इतिहासातील पहिलीच घटना.. ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांनीच बंद पुकारला - फडणवीस
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून हा तर सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहेत. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचे सरकार बरं होते. हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले. तसेच सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजपाला सत्तेची मस्ती, अद्यापही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही - सुप्रिया सुळे
भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही ! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर शरसंधान साधले. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार, नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार
फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे.
'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत..
महाराष्ट्रात बंद सुरू झालेला आहे. या महाराष्ट्र बंदकडे देशाचा समस्त शेतकरी फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. देशातला संपूर्ण शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असलेला समाज हा न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्र हे न्यायप्रिय राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राने शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी बंद पुकारला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.लोकांचा शेतकऱ्यांच्या संदर्भातला संताप समजून घेतला पाहिजे. जर कोणी म्हणत असेल, की आमचा बंदला पाठिंबा नाही तर त्याने आपण स्वतःला या देशाचे खरंच नागरिक आहोत का? आपण या शेतकऱ्यांचे काही देणे लागतोय का? असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे असही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
आघाडी सरकारने 'बेस्ट'ला नुकसान भरपाई द्यावी - भाजपची मागणी
मुंबई - उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खीरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून बसची तोडफोड करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच आज दिवसभर बसेस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे, अशी मागणी बेस्ट समितीचे भाजप सदस्य सुनिल गणाचार्य यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.
महाराष्ट्र बंद म्हणजे आघाडी सरकारचा "कांगावा" - गोपीचंद पडळकर
सांगली - "महाराष्ट्र मधील बंद म्हणजे आघाडी सरकारचा कांगावा" असून आपल्या घरात आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखा हा प्रकार आहे,अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच तुम्हाला काकाचे दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. म्हणूनच याचं पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा केला आहे,अशी टीकाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते.
कोल्हापुरात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने रोखला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ आज(सोमवारी) शिवसेनेने कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. लखीमपूर येथील हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कडक कारवाई करून भाजपचा निषेध करण्यात आला. जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर राहून आंदोलन करतच राहील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.