मुंबई : आज राज्यातील अनेक भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उकाड्याने परेशान झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातही सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली जाऊ शकते.
..तरच मान्सूनला मिळणार बळकटी : कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.
राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज - भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.