मुंबई : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली ( Heavy Rain Alert Maharashtra ) आहे. काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अरबी समुद्रात रेंगाळले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून थांबला ( Maharashtra Weather Forecast ) आहे.
..तरच मान्सूनला मिळणार बळकटी : उद्यापासून (दि. 8) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.
यावर्षी २९ मेलाच मान्सून केरळात : यावर्षी मान्सून 16 मे रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर 29 मे रोजी तो केरळात दाखल झाला. कर्नाटकपर्यंत मान्सूनची वाटचाल योग्य वेळेतच सुरु होती. मात्र अचानक मान्सूनचा प्रवाह कुमकुवत झाल्याने तो कर्नाटकातच थांबला आहे. दुसर्या बाजूने मात्र संपूर्ण इशान्य भारत मान्सूनने व्यापला गेला आहे. सिक्किम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली असून, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात बर्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील वाटचालीला पोषक स्थिती निर्माण झाली नसल्याने मान्सूनची वाटचाल थांबली आहे.