मुंबई - अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल ताशेरे ओढले. अध्यक्षांनी राज्याच्या मुख्य सचिवांनाच धारेवर धरले. विधिमंडळ सचिवालयाकडून प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळत नसल्याने नाराज झालेल्या अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची जाणिव सभागृहाला करुन दिली. यावेळी बोलताना त्यांनी 'जर मी कारवाई केली तर मुख्य सचिवांना जामीनही मिळणार नाही' अशा भाषेत प्रशासनाला आणि सरकारला सुनावले.
हेही वाचा... 'गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे'
प्रशासनाच्या कामकाजावर भडकले विधानसभा अध्यक्ष...
विधिमंडळात उपस्थित झालेल्या औचित्यांच्या मुद्यांना उत्तरे दिली जात नाहीत, म्हणून विधानसभा अध्यक्ष भडकले. त्यांनी मागील अधिवेशनात 83 औचित्यांचे मुद्दे उपस्थित केले त्यातील केवळ ४ मुद्यांना उत्तर दिले गेल्याचे सांगितले. सभागृहातील प्रश्नांना एका महिन्यात उत्तर द्यावे लागते. मात्र, विधिमंडळ सचिवालयाकडून पाठपुरावा करुनही प्रशासन उत्तर देत नाही, या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष चांगलेच भडकले. त्यांनी त्यांच्या अधिकाराखाली मुख्य सचिवांना सभागृहात येऊन माफी मागण्याचे निर्देश दिले. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी विनंती केल्यावर अध्यक्षांकडून शिक्षा मागे घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अध्यक्षांना विनंती केली होती.
हेही वाचा... ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नव्हतं; मात्र, आता सर्वकाही चालतंय - चंद्रकांत पाटील
अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी...
विधानसभा अध्यक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे अस् होणार नाही याची खात्री देत असल्याचे म्हटले. मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना आपण आणि मुख्यमंत्री सक्त सूचना देऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले. तसेच पुन्हा अशी वेळ येणार नाही, याची खात्री देत असल्याचे सांगितले. आतापर्यंत कोणत्याही अध्यक्षांनी मुख्य सचिवांना अशी शिक्षा दिली नाही, याची आठवण करुन देत पवारांनी अध्यक्षांनी मुख्य सचिवांना माफ करावे, अशी विनंती केली.
फडणवीसांनी केले अध्यक्षांच्या भुमिकेचे स्वागत...
देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणावर बोलताना अध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी जी भावना दाखवली त्याचे स्वागत केले. तसेच कोणावरही कारवाई करताना आपल्याकडे बोलवून संधी दिली पाहिजे, असे मत मांडले. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे क्षमा मागितली असल्याने त्यांना बोलावून घेत कडक समज द्यावी, अशी मागणी केली.
हेही वाचा... ..तर अधिकाऱ्यांना दांडक्याने मारा; 'त्या' शेतकरी कुटुंबाला प्रवीण दरेकरांचा सल्ला
सभागृहाचे पावित्र्या न राखल्यास कडक भुमिका घेणार - अध्यक्ष
सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसेल तर कडक भूमिका घेणे भाग पडते. तहसीलदार, ठाणेदार आमदाराचा मान ठेवत नसल्याच्या तक्रारी येतात. यापद्धतीने प्रशासनाची वागणूक असेल आणि आमदारांच्या तक्रारी आल्या तर आपण यापुढे मुख्य सचिवांनाच जबाबदार धरू. तसेच मागील अधिवेशनात ८३ औचित्याचे मुद्दे मांडले गेले, त्यातील ४ औचित्यांच्या मुद्यांना उत्तरे दिली गेली. असेच होणार असेल तर आपण जोपर्यंत या खुर्चीवर आहे, तोपर्यंत हा अपमान सहन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अध्यक्षांनी घेतली.