मुंबई - महामंडळाने अद्याप सेवा निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाही. त्यामुळे, निवृत्त एसटी कामगारांची देणी तातडीने द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात लालपरीच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाकडून सेवा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे थकविण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहे.
व्यवस्थापकीय संचालकाची घेतली भेट
सन २०१८ सालपासून सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची अंतीम देयके प्रलंबित आहेत. रजेचे वेतन व एकतर्फी वेतनवाढीचा फरक अद्यापही त्यांना दिलेला नाही. जवळ पैसे नसल्याने सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या महामंडळाची 30- 35 वर्षे सेवा केली, ज्या लालपरीसाठी घाम गाळला, त्या लालपरीच्या सेवकांना औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांची देणी तातडीने व एकरकमी देण्यात यावी, यासाठी २१ जून २०२१ रोजी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटीमहामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदारजी पोहोरे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तांच्या व्यथा मांडल्या. तसेच, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची देणी तातडीने देण्याबाबत सूचित केले.
आंदोलनाची दिशा ठरवणार
यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केलेला आहे. शेखर चन्ने यांनी रक्कम देण्याबाबत अनुकुल मत व्यक्त केले असून विद्यमान कर्मचाऱ्यांच्या एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरित रक्कम देण्यात यावी, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ३ टक्के वेतनवाढीचा दर व सेवानिवृत्तांची देणी तातडीने देण्यात यावी, अन्यथा संघटनेकडून ४ जुलै 2021 रोजी मध्यवर्ती कार्यकारीणीत सभा होणार आहे. या सभेत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे