मुंबई - इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांना शाळेत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळावी. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून पत्रव्यवहार केले आहे. तसेच आंदोलनही केले परंतु अजूनही प्रवासाची सवलत मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षकांना निकालाचे काम घरातून करण्याची परवानगी द्यावी तसेच अन्य शिक्षकांना शाळेत न बोलवता त्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून करण्यात आली आहे.
निकालावर होणार परिणाम -
शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के तर दहावी आणि बारावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंतर्गत मूल्यमापन होईपर्यंत १०० टक्के उपस्थितीचे आदेश काढले आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार दहावीच्या निकालाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी मिळावी, याकरिता सर्वच स्तरावर सतत प्रयत्न केले आहे. तसेच आम्ही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमावरी सर्व शिक्षक आपल्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन सेल्फी आंदोलन केले आहे. याशिवाय दंड भरून लोकल प्रवास केला आहे. परंतु अद्यापही लोकल प्रवासाची शिक्षकांना मुभा दिलेली नाही. त्यामुळे दहावी- बारावीच्या निकालावर परिणाम होणार असल्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र -
इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळेत जाणे गरजेचे आहे. रेल्वे प्रवासासाठी शिक्षकांची नावे शासनाने संकलित केली असली तरी त्यावर अजूनही काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सुध्दा रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांनाही निकालाचे काम घरातून करण्याची परवानगी द्यावी. तसेच अन्य शिक्षकांना शाळेत न बोलवता त्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई विभागाचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी केली आहे. यासंबंधीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
हेही वाचा - कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग होणार सुरू? मुख्यमंत्र्यांचे शिक्षणविभागाला निर्देश
हेही वाचा - शरद पवारांची नवी आघाडी हा बातमीत राहण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न - भाजप नेते माधव भंडारी