मुंबई - बारावीच्या परीक्षेत सुरू असलेल्या पेपरफुटीच्या गोंधळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( Maharashtra ssc exam 2022 ) दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 478 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - परिवहन मंत्र्यांच्या आव्हानाला केराची टोपली; ५० हजारपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी!
21 हजार 384 ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण झाले असतानाच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, मंडळाने राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 ची दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 50 मुख्य केंद्र व 16 हजार 334 उपकेंद्रे मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या दरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आलेला आहे.
मुंबई विभागातून 3 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार परीक्षा -
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी हे नऊ विभागांपैकी मुंबई विभागातील आहे. मुंबई विभागात तीन लाख 73 हजार 840 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नोंदणी केली आहे. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 122, पालघर जिल्ह्यात 61 हजार 866, रायगड जिल्हात 36 हजार 996, मुंबई पश्चिम 65 हजार 497, मुंबई उत्तर 51 हजार 868 आणि मुंबई दक्षिण 33 हजार 590 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
परीक्षा सुरळीत पार पडेल - नितीन उपासणी
राज्य मंडळाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन उपासणी यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी न घाबरता व गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, उपकेंद्र संचालक, शिपाईपासून सर्व कर्मचारी, कस्टोडियन सहाय्यक परीक्षक यांच्यासोबत तीन बैठका घेऊन त्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे, दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पडेल.
हेही वाचा - Childrens Vaccination Mumbai : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांचे ३०० केंद्रांवर लसीकरण