हैदराबाद - चार लॉकडाऊननंतर आता हळूहळू देशभरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार पंतप्रधानांनी टप्प्याटप्प्याने राज्ये 'अनलॉक' करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार 'मिशन बिगिन अगेन'ला सुरुवात झाली आहे. त्यातूनच राज्यातील व्यवहार आता हळूहळू सुरळीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा राज्यभरातील आढावा...
महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार, जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबईमधील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू झाली आहेत. शहरातील एक गजबजलेला भाग म्हणजेच दादरमधील रानडे रस्त्यावरील परिसरात बऱ्याच काळानंतर नागरिकांची वर्दळ दिसून आली. पावसाळा आणि शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, जूनमध्ये छत्री, रेनकोट, गणवेश, दप्तर अशा वस्तू मिळणाऱ्या दुकानांमध्ये बऱ्याच प्रमाणात उलाढाल होत असते. दादर रोडवरीलही कपडे, दप्तर, होजिअरी आणि मिठाईची दुकाने सकाळी ९ पासून खुली झालेली दिसून आली. यावेळी दुकानदार आणि ग्राहकही मास्क, रुमाल किंवा ओढणी अशा गोष्टींचा वापर करत स्वसुरक्षा बाळगताना दिसून येत होते.
पुण्यातील गजबजलेल्या जागा, म्हणजेच तुळशीबाग आणि महात्मा फुले भाजी मंडईही शुक्रवारपासून सुरू झाली. तब्बल अडीच महिन्यांनंतर दुकाने सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्राहक आणि दुकानदारही स्वसुरक्षा बाळगत सर्व व्यवहार करताना दिसून आले.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात सम-विषम पद्धतीने बाजार पेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कापड दुकानांना चेंजिंग रूम वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर घेतलेले कपडे बदलून देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. तसेच 'होम डिलिव्हरी' शक्य असणाऱ्या व्यावसायिकांना सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहेत. दुकानदारांना दुकानात सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल-गन ठेवण्यास सांगण्यात आले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या 'मिशन बिगिन अगेन'च्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पोलीस विभागातर्फे प्रत्येक ठिकाणी लाऊडस्पीकरवरून नियम सांगण्यात आले होते. शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून दुकान सुरू करण्यास व्यावसायिकांनी संमती दर्शवली असली, तरी सम-विषम तारखेला बाजार घडण्यास मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत व्यापारी महासंघाने मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
जळगावमध्येही बाजारपेठ सुरू झाली आहे. मात्र, मॉल्स आणि व्यापारी संकुल यांना उघडण्यासाठी परवानगी न मिळाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. व्यापारी संकुल कशाला म्हणायचे, किंवा सम-विषम पद्धत कशी लागू करायची याबाबत व्यापाऱ्यांनाही नीटशी माहिती नसल्यामुळे, दुकाने सुरू करायची का किंवा कशी करायची याबाबत त्यांच्यामध्ये अद्यापही संभ्रम आहे. दरम्यान, शहरात इलेक्ट्रॉनिक, कापड, हार्डवेअर, पुस्तके अशी दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकही स्वसुरक्षा राखत खरेदी करत आहेत.
धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये मात्र दोन महिन्यानंतर दुकाने उघडल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मास्क, रुमाल याचा वापर नागरिक करत आहेत. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर लोकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात बाकी ठिकाणी शुक्रवारपासून दुकाने खुली झाली असताना नाशिकमध्ये मात्र शनिवारपासून 'मिशन बिगिन अगेन'ला सुरुवात होणार आहे. महानगरपालिका आयुक्तांनी शुक्रवारी सर्व विभागीय अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे नाशिककरांना दुकाने खुली करण्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे.